विकासाच्या प्रवाहात शेतकरी कोरडा का? | ग्रामस्वराज्य व पाणी व्यवस्थापन | Gandhi Gram Swaraj& Farmer Issues
🌧️ प्रस्तावना
आजकाल विकासाचं चित्र म्हणजे धरणं, सिंचन प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना आणि औद्योगिक वसाहती. पण या प्रवाहात शेतकरी मात्र कोरडा राहतो. पिकाला पाणी नाही, सिंचनाची सोय नाही, आत्महत्या थांबत नाहीत. मग प्रश्न असा - इतक्या विकासानंतरही शेतकरी सुखी का नाही?
दै. लोकमतनुसार, सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरिपाची पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ६० लाखांहून अधिक हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्ये आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे, हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले, शेतं पाण्याखाली गेली, घर कोसळली, विहिरी बुजल्या.
कधी दुष्काळ –कधी पूर, या दुहेरी संकटात शेतकरीच सर्वाधिक बळी ठरतो. इतके धरणं, विकास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प असूनही ग्रामीण भारत, विशेषतः शेतकरी अजूनही असुरक्षित का आहे, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. याचं उत्तर शोधताना आज 'गांधी जयंती' दिवशी, गांधीजींच्या ग्राम-स्वराज्याच्या संकल्पना आणि आजच्या विकास प्रवाहातील विसंगती या दोन्हींचा विचार करणे क्रमपाप्त ठरते
🏞️ मराठवाडा पुराचे वास्तव आणि नियोजनाचा अभाव
या वर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. धरणांतून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे गावं बुडाली. शेकडो लोकांचे मृत्यू झाले, हजारो लोक स्थलांतरित झाले. खरीप हंगामातील मका, उडीद, तूर, मूग, कापूस, सोयाबीनसारखी पिकं पूर्णपणे वाहून गेली. दुग्ध व्यवसाय आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीत केवळ नैसर्गिक आपत्तीच नाही तर मानवी नियोजनातील त्रुटीही संकटाला जबाबदार असल्याचं दिसून येतं.
🌾 विकासाचा प्रवाह आणि शेतकरी कोरडा का?
आजकाल “विकास” या शब्दाची लोकांच्या मनातील समज काहीशी मर्यादित झाली आहे. बहुतांश लोक विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ, मोठ्या इमारती, रस्ते, गाड्या, उद्योग आणि महागडी वस्तू असे समजतात.
परंतु खऱ्या अर्थाने विकास म्हणजे मानवाचे जीवनमान सुधारणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि आर्थिक स्थैर्य यांचा संतुलित प्रगतीचा मार्ग होय
पण, विकासाकडे जेंव्हा, मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जाते तेंव्हा, शेतकरी कोरडा राहतो. धरणांमधील पाणी प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी राखून ठेवले जाते, तर शेतीसाठी फक्त तृतीयांश पाणी उपलब्ध होतं. धरणांमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना योग्य पुनर्वसन मिळत नाही. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात दुष्काळ यामुळे शेतीचं नुकसान वारंवार होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न स्थिर राहत असताना, बियाणं, खतं, डिझेल इ, खर्च
मात्र सतत वाढत असून, यामुळे कर्जबाजारीपण वाढतं आणि दुसरीकडे बाजारात योग्य भाव मिळत नाही. हा विरोधाभास स्पष्ट करतो की विकासाच्या प्रवाहात शेतकरी केंद्रस्थानी नाही.
🌱 गांधीजींचे ग्रामस्वराज्य — उपायाची दिशा
महात्मा गांधी म्हणाले होते – “भारत गावांत राहतो.” त्यांच्या मते प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण प्रजासत्ताक असावं. ग्रामसभा हा निर्णय घेण्याचा केंद्रबिंदू असावा, गाव पातळीवर पाणी, जमीन, जंगल यांचं व्यवस्थापन व्हावं, स्वावलंबी आणि शाश्वत शेती व्हावी आणि सामुदायिक जबाबदारी निर्माण व्हावी. हीच संकल्पना आज पूर-दुष्काळ व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरते.
💡 ग्रामस्वराज्य आणि आजची आपत्ती व्यवस्थापन
ग्रामस्वराज्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पूर-दुष्काळ व्यवस्थापनात अनेक शक्यता आहेत.
छोटे बंधारे, तळी आणि शेततळी शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत, पण जर ते नियोजनाशिवाय आणि शास्त्रीय अभ्यासाशिवाय बांधले गेले, तर ते पाणी अडवण्याऐवजी पुराचे कारण बनू शकतात. त्यामुळे, स्थानिक जलव्यवस्थापन (Local Water Management) आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे, आपत्तीच्या वेळी ग्रामसभा त्वरित स्थलांतर, अन्नधान्य वितरण आणि जनावरांच्या सुरक्षेचे निर्णय घेऊ शकते. गाव पातळीवर धान्य व चारा बँका तयार केल्यास संकटाच्या काळात समुदायाला आधार मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गाव स्वतःच्या संसाधनांचा उपयोग करून प्रश्न सोडवू शकतं.
⚠️ मर्यादा आणि वास्तव
तथापि, फक्त गांधीजींच्या तत्त्वांवर विसंबून राहून भागणार नाही. हवामान बदलामुळे पूर-दुष्काळाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आधुनिक हवामान अंदाज, डिजिटल अलर्ट, आणि धरण व्यवस्थापन यांसाठी तंत्रज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. शासनाची भूमिका इथे अत्यंत महत्त्वाची आहे.
🔑 उपाय आणि दिशा
यावर उपाय म्हणून पंचायतराज संस्थांना बळकटी देणं गरजेचं आहे. स्थानिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, हवामानावर आधारित शेती पद्धती अवलंबणं, बटईने शेती करणारे व महिला शेतकऱ्यांना न्याय्य भरपाई देणं हे महत्त्वाचे टप्पे आहेत. जलवाटप समित्या शेतकऱ्यांच्या नियंत्रणाखाली असाव्यात आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा व्यापक वापर व्हावा." पाणी साक्षरता अभियान" राबवून लोकांना पाण्याचं महत्त्व पटवून देणं आणि रोजगार, आरोग्य, शिक्षणासह समग्र ग्रामीण विकास घडवणं हेच खरी दिशा ठरते.। जल साक्षरता अभियान
🤔निष्कर्ष
पूर-दुष्काळ हा फक्त नैसर्गिक प्रश्न नाही; तो विकास धोरणातील विसंगतीही दाखवतो. गांधीजींचं ग्रामस्वराज्य सांगतं की गाव स्वयंपूर्ण असावं आणि संसाधनांचं नियोजन स्थानिकांच्या हाती असावं. आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज आणि शासनाच्या धोरणांची सांगड घालून गावांना आपत्ती-प्रतिरोधक करणे हीच खरी गरज आहे.
म्हणूनच आज प्रश्न आहे – “पूरातून काय शिकलं पाहिजे?” आणि “विकासाच्या प्रवाहात शेतकरी कोरडा का?”
याचं उत्तर एकच आहे – ग्रामस्वराज्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि न्याय्य धोरणं. ह्याचं मिश्रण केल्यावरच सशक्त, स्वावलंबी आणि सुखी ग्रामीण भारत उभा राहू शकतो.
खूप छान प्रयत्न झाला वास्तव मांडले शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती चा अभ्यास म्हणून लावून केलेला दिसतो. खरं म्हणजे वास्तुस्थिती दर्शवण्यात ब्लॉगच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न झाला. अशा सामाजिक प्रश्नांना समजून घेणं त्याचा वास्तव मान्य आणि निवारण्यासाठी काही उपाययोजना असतील त्या मांडल्या तर निश्चितच सामाजिक समस्यांचे निवारण होऊ शकते. पुढील कार्यास शुभेच्छा.
ReplyDeleteKhedyakade Chala
ReplyDeleteउत्तम मांडणी
ReplyDeleteखरं वास्तव मांडलं आहे ... मराठवाड्याच
ReplyDelete